एप्रिलपासून कार इन्शुरन्सही महागणार; असा पडेल खिशावर ताण

केंद्र सरकारने एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स अनेक वाहनांसाठी वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम अप्रत्यक्षपणे सर्वच व्यवहारावर होताना दिसत आहेत. केवळ इंधनच नव्हे तर इतर वस्तुंमध्ये महागाई वाढली आहे. विशेषत: ऑटोमोबाइल क्षेत्रात सर्वच दर वाढले असून, ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसताना दिसत आहे. आता तर एप्रिल २०२२ पासून कारचा इन्शुरन्स देखील वाढविण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स अनेक वाहनांसाठी वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मसुदा अधिसूचनेत ही माहिती समोर आली आहे. या प्रस्तावासाठी केंद्र सरकारने सूचना आणि हरकती मागवल्या असून त्यानंतर थर्ड पार्टी इन्शुरन्सचा बेस प्रीमियम वाढवला जाईल.

खासगी इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक टू-व्हीलर आणि इलेक्ट्रिक मालवाहकांसह व्यावसायिक वाहनांच्या विम्यावर १५ टक्के सूट दिली जाणार आहे. पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांवर सरकार ७.५ टक्के डिस्काउंट देण्याच्या तयारीत आहे. १.० लीटर इंजिन कार, 1,500 सीसी इंजिन कार आणि १५०-३५० सीसी शिवाय याहून अधिक दमदार बाइक्सवर आता ग्राहकांना इन्शुरन्स बेस प्रीमियम आधीहून अधिक भरावा लागेल.

कमर्शियल वाहनांच्या विम्याचा बेस प्रीमियमही आता वाढणार आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्स अंतर्गत स्वत:च्या वाहनाचं अधिक नुकसान कव्हर करतं आणि हे वाहन मालकांनी खरेदी करणं अनिवार्य असतं. हा विमा थर्ड पार्टीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास कव्हर करतो. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मार्च २०२२ च्या अखेरीस विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ करण्याबाबतच्या मसुदा अधिसूचनेबाबत सूचना मागवल्या आहेत.

त्याशिवाय, जुन्या वाहनांच्या Re-Registration साठी लागणारं शुल्क १ एप्रिल २०२२ पासून जवळपास आठ पटींनी वाढणार आहे. जुन्या वाहनांमुळे होणारं वायूप्रदूषण कमी करणं हा सरकारचा उद्देश असून, त्यामुळे जुन्या वाहनांची संख्या घटवण्याचा सरकारचा विचार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.