अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मातोश्रीवरून उमेदवार जाहीर; शिंदे गटाकडे लक्ष!

ठाकरे-शिंदे यांच्यातील पहिली लढत

0

मुंबई : लोकराष्ट्र वृत्तसेवा

महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्तानाट्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पहिली लढत होणार आहे. यासाठीचं पहिलं पाऊल उद्धव ठाकरेंनी टाकलं आहे. अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी उमेदवाराची घोषणा केली आहे. अंधेरी पूर्वमधून शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झालं होतं, त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली आहे.

रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. अंधेरी पूर्वची ही पोटनिवडणूक कधी होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे, कारण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचा हा पहिलाच सामना आहे. तसंच या निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार, हेदेखील महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेना नेमकी कुणाची यावरून सध्या सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू आहे. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक होईपर्यंत जर या दोन्ही प्रकरणांचा निकाल लागला नाही, तर शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाऊ शकतं, अशा परिस्थितीमध्ये शिंदे आणि ठाकरे यांना वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते.

जून महिन्यामध्ये विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांबरोबर बंड केलं. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ५५ पैकी ४० आमदार गेले, याशिवाय त्यांना १० अपक्ष आमदारांनीही पाठिंबा दिला. शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने पाठिंबा दिला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.