बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या देशव्यापी संपामुळे कोट्यावधींची उलाढाल ठप्प, ‘या’ मागण्यांसाठी पुकारला संप!

सिमेंट, स्टील दरवाढीच्या विरोधात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचा देशव्यापी संप यशस्वी  

0

नाशिक :- स्टील व सिमेंटमध्ये झालेल्या भाववाढी विरोधात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे    देशव्यापी   एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता .  जशी अन्य उद्योगासाठी सरकारतर्फे नियामक प्राधिकरण आहेत त्याच धर्तीवर सिमेंट व स्टील नियंत्रण प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी तसेच परवडणारी घरे या संकल्पनेस अवाजवी दर वाढ करून बाधा पोहोचविणारया सिमेंट दरवाढीची उच्चस्तरीय चौकशी   करून  योग्य ती कारवाई करावी या दोन प्रमुख मागण्यासाठी हा संप पुकारल्याची माहिती   बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया नाशिक शाखेचे अध्यक्ष राहुल  सूर्यवंशी यांनी दिली . या बंद मुळे आज कोट्यावधीची उलाढाल ठप्प झाली होती . आपल्या मागण्याचे निवेदन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे पालकमंत्री छगन भुजबळ , जिल्हाधिकारी सुरज मांढरे , व मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांना देण्यात आले .

अध्यक्ष राहुल  सूर्यवंशी  यांनी सांगितले की बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया हि सन १९४१ मध्ये स्थापन झालेली बांधकाम व्यावसायिकांची देशपातळीवरील संस्था आहे. बांधकाम क्षेत्र हे देशातील सर्वात जास्त जी.डी .पी. निर्माण करणारे क्षेत्र असून बांधकाम उद्योगावर ४०० हून अधिक संलग्न व्यवसाय संस्था अवलंबून आहेत. ६ कोटी पेक्षा अधिक रोजगार निर्माण करणारे हे क्षेत्र आहे. देशातील गृहनिर्माणासाठी सर्वाधिक म्हणजे सुमारे ५५ ते ६५ टक्के सिमेंट व स्टीलचा वापर करण्यात येतो. हेच प्रमाण वाणिज्य व औद्योगिक बांधकामासाठी १० ते १५ टक्के,  मुलभूत सुविधांसाठी १५ ते २५ टक्के व औद्योगिक निर्माणासाठी ५ ते १५ टक्के आहे. यामुळे वाढलेल्या दरांचा सर्वाधिक फटका  हा गृहनिर्माण क्षेत्राला बसणार असल्याचेही त्यांनी नमुद केले.

स्टील व सिमेंटच्या दरात गेल्या तीन महिन्यांत सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे बांधकामाच्या  दरांमध्ये  देखील  ३० ते ४० टक्क्यांनी  वाढ झालेली आहे. त्यामुळे सामान्यांना घरे परवडेनाशी झाली आहेत . या दरवाढीचा फटका हा  सरकारी कामे व इन्फ्रास्ट्रक्चरची कामे यांना    देखील   बसला  आहे.  यापूर्वी देखील बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने एमआरटीपी नुसार दाखल केलेल्या तक्रारीवर सिमेंट कंपन्यांना ३९७.५१ कोटी इतका दंड केला होता. त्यावर सिमेंट कंपन्यांनी अपील केले असून त्याचा निकाल प्रलंबित आहे.

सिमेंट व स्टील कंपनीच्या नफेखोरीच्या विरोधात राज्यसभा व लोकसभा यामध्ये देखील चर्चा होऊन सिमेंटच्या कृत्रिम दरवाढीचा सामान्य माणसावर बोजा पडू नये अशीच मागणी करण्यात आली.  याच मागणी कडे लक्ष वेधण्यासाठी  व निषेधासाठी देशभरासह  पूर्ण नाशिक जिल्ह्यातील बांधकामे शुक्रवारी बंद ठेवण्यात आली.  बिल्डर्स  असोसिएशन ऑफ इंडिया  तर्फे  पुकारलेल्या या संपामध्ये अन्य बांधकाम संघटनाही सहभागी झाल्यामुळे आज शहर व जिल्ह्यातील सर्व नवीन बांधकामे तसेच सरकारी  कामे देखील बंद ठेवण्यात आली.

निवेदन देतांना बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया च्या नाशिक शाखेचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, माजी अध्यक्ष अविनाश पाटील, मोहन कटारिया,रामेश्वर मालानी, मदन जगोटा, राजेंद्र मुथा, भाऊसाहेब सांगळे, मनोज खांडेकर, विलास निफाडे, सुरेश पवार , शिवाजी घुले, प्रवीण जाधव, अमित अटल, गोरख काटकर, जोशी जोसेफ, प्रशांत सोनजे, महेश भामरे, रमेश शिरसाट व महेंद्र पाटील हे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.