दंगली घडवून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजप-मनसेचा डाव; एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

जळगाव : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात मोठे वादंग निर्माण झाले आहे. शिवाय दोन गट समोरासमोर उभा ठाकला आहे. मनसेच्या भूमिकेशी भाजप समरस असून, महाविकास आघाडी दुसऱ्या गटात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भोंग्यांच्या मुद्याला पुढे करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव असल्याचा थेट आरोप केला आहे. त्यामुळे आता पुन्हा यावर भाजप नेत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनाही पुन्हा लक्ष्य केले आहे.

भोग्यांच्या मुद्द्यावरून दंगल घडवायची अन् राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा विरोधकांचा मोठा डाव आहे. भोंगे सर्वसामान्यांचे पोटपाणी भरू शकत नाही. मात्र यामुळे राज्यात कायदा -सुव्यवस्था बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे, असेही खडसे म्हणाले. तर ओबीसी आरक्षणावर बोलताना त्यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ओबीसींसाठी अत्यंत दुर्दैवी आहे.

ओबीसींवर अन्याय होणारा आहे. मागच्या दाराने ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्याचा हा प्रयत्न आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर आरोप केला. तसेच चंद्रकांत पाटील आज महाविकास आघडी सरकारवर हल्ला करत असतील, पण मागच्या काळात त्यांच्या वेळीही हा प्रश्न होताच की, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा ओबीसींना आरक्षण कशाप्रकारे मिळवून देता येईल, याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. आज ओबीसींमध्ये मोठा संताप आहे. असेही ते म्हणाले.

तर खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. भाजपची सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक ओबीसी समाजाला आरक्षणापासून दूर ठेवले, असा थेट आरोप आज खडसेंनी पुन्हा एकदा केला. तर पाच वर्षात काही बोंबाबोंब केली नाही आणि आता महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसत आहेत, असेही खडसे म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.