नाशिकध्ये होऊ घालतेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे देणार

पालकमंत्री छगन भुजबळ यांची माहिती

0
नाशिक :  येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या अधिनस्त १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न ४३० खाटांचे रूग्णालय सुरु करण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, ही मान्यता म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या १५१ व्या वर्षात राज्य शासनाने जिल्हावासीयांना दिलेली एक अभूतपूर्व अशी भेट असून त्याचबरोबर ती एक मोठी उपलब्धीही आहे, येत्या शैक्षणिक वर्षात या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ केंद्र सरकारला सादर करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. 
ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात  आज नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी  पी.एस.मीना,उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ अधीक्षक अभियंता शरद राजभोज, महावितरण चे अधिक्षक अभियंता श्री. दारोळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे समन्वयक अधिकारी डॉ.संदीप गुंडरे,मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, नाशिक येथे १९९९ मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. या विद्यापीठास राज्यातील सर्व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाचे महाविद्यालय संलग्नित आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत अध्यापन व संशोधन तसेच अतिविशेषोपचार सेवा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याची मागणी वारंवार केली जात होती. त्यासाठी शासनाकडे प्राथम्याने पाठपुरावा सुरू होता. हे महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी सुमारे ६२७ कोटी ६२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमाच्या तरतूदीनुसार अभ्यासक्रमांचे व इतर शुल्क निश्चित करून आकारणी करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येत झालेली वाढ आणि वैद्यकीय शिक्षणाबाबत तसेच आरोग्य सुविधेबाबत निर्माण झालेली जागरुकता लक्षात घेऊन नवीन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरु करणे गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यातील उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा विचार करता नाशिक जिल्ह्यात देखील अतिविशेषोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात नाशिक जिल्ह्यात वैद्यकीय पर्यटनाच्या संधी निर्माण व्हाव्यात व नाशिक एक वैद्यकीय हब म्हणून विकसित करण्यासाठी आपला मानस असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठीच्या सर्व बाबींच्या सुक्ष्म आराखड्यासह प्रस्ताव तात्काळ केंद्र शासनास सादर करावा. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक संलग्नित या महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासाठीच्या पायाभूत सुविधांच्या आधारावर पदव्युत्तर पदवी संस्था स्थापन करण्यास तसेच त्यामध्ये १५ विषयांमध्ये एकूण ६४ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा निर्माण करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या अधिनस्त पूर्णत: स्वायत्त संस्था असणार आहे. हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे मंत्रालय स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
विद्यापीठाला तात्काळ भूखंड उपलब्ध करून देणार : सूरज मांढरे 
ओरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने दिलेली मान्यता म्हणजे नाशिकच्या १५१ व्या वर्षात जिल्ह्याच्या शाश्वत आरोग्यासाठीची व विकासाची ही पायभरणीच असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य विज्ञान विद्यापीठाला तात्काळ भुखंड उपलब्ध करून देण्यासोबतच अन्य प्रशासकीय पातळीवरील कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकीच्या सुरूवातीला दिली.
तसेच विद्यापीठ प्रशासनानेही पारंपरिक नियमावलीच्या मापदंडात न अडकता हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी अपवादात्मक बाब म्हणून सर्वच पर्याय खुले ठेवावावेत असे सांगून श्री. मांढरे यांनी कोरोना काळात यापूर्वी जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करून टेस्टिंग लॅब सुरू केली होती. तशाच प्रकारे मिशन मोडवर विद्यापीठाने हे महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यासाठी मार्चअखेरपर्यंत भूमीपूजन व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे,  जिल्हा रूग्णालय, संदर्भसेवा रुग्णालयात तसेच महापालिकेच्या रूग्णालयातील साधन- सुविधांसह तेथिल तज्ञ मनुष्यबळ घेवून हे महाविद्यालय सुरू करता येईल असेही यावेळी जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव श्री चव्हाण यांनी विद्यापिठाकडे स्थापनेपासून तर सद्यस्थितीत विविध पातळींवर असलेली क्षमता, भविष्यातील गरज व महाविद्यालय सुरू करण्यासाठी करत असलेल्या कामकाजाची माहिती यावेळी दिली.
प्रस्तावित जागेची केली पाहणी
या महाविद्यालय व रुग्णालयासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे आवश्यक जागा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परिसरामध्ये उपलब्ध करुन देण्यासही मान्यता देण्यात आली, आहे त्यानुसार आज बैठक संपल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी विद्यापीठाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह विद्यापीठाच्या आवाराला लागून असलेल्या प्रस्तावित जागेस प्रत्यक्ष भेट भेट दिली. यावेळी स्वतंत्र आर्किटेक्टद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाने या महाविद्यालयायाच्या भुखंडाचा विचार करून आराखडा तयार करावा असे यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.