पतीवर सुडबुद्धीने कारवाई, कितीही वार केले तरी पुरून उरेन – चित्रा वाघ

नाशिकमधील पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांचा संजय राठोडवर हल्लाबोल

0
नाशिक : पूजा चव्हाण प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याने मला व माझ्या कुटुंबीयांना त्रास दिला जात आहे, असा घणाघाती आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला. माझे पती किशोर वाघ यांनी एक रुपयाही घेतलेला नसून ते प्रकरण न्यायप्रविष्ट असताना राज्य सरकारने केवळ सूडबुद्धीतून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र कितीही धमक्या दिल्या, वार केले, चौकशा लावल्या तरी मी पुरून उरेन, अशा शब्दांत त्यांनी सरकारला इशारा दिला.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या वाघ यांनी शनिवारी (दि.२७) भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. वाघ पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता महाविकास आघाडीचे सर्व मंत्री राजकारणासाठी एकत्र आले असून, जनतेच्या प्रश्नांशी त्यांना देणे-घेणे नाही. ते एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. पूजा चव्हाण प्रकरणात राठोड यांनी राजीनामा द्यावा, हा मुद्दा मी लावून धरल्याने आकसापोटी माझ्या पतीवर कारवाई करण्यात आली. वास्तविक या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. गजानन भगत याची चौकशी सुरू असतानाही माझ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख तुम्हाला तीनदा सॅल्युट असल्याचा टोमणाही त्यांनी लगावला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून किशोर वाघ यांचा छळ केला जात असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला.
पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांनी १०० क्रमांकावर आलेला कॉल ते खासगी व्यक्तीकडे कसा काय हस्तांतरित करू शकतात, असा प्रश्न उपस्थित करत खुर्चीसाठी सारे काही सुरू असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवगळता अन्य सर्व मंत्री राजकारणासाठी एकवटले आहे. मुख्यमंत्री हे प्रामाणिक असून, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त करताना कितीही धमक्या आल्या तरी या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत लढाई सुरू ठेवणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.

पवार साहेब तुमची आठवण येते

पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते आहे

५ जुलै २०१७ ला माझ्या पतीवर गुन्हा दाखल झाला आणि ईदच्या दिवशी ७ जुलैला शरद पवार यांनी बोलावले. माझ्याकडे पंचनाम्याची, एफआयआरची कॉपी मागितली. ती पाहिली आणि त्यांनी सांगितले की, चित्रा, तुझा नवरा यात कुठेच नसल्याचे सांगत पवारांनी तुझा नवरा निर्दोष असल्याचे त्यावेळी म्हटले होते, अशी आठवण वाघ यांनी सांगितली.

शिवसेनाप्रमुखांनी फाडून खाल्ले असते

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत पूजा चव्हाण प्रकरण घडले असते तर त्यांनी सर्वप्रथम संजय राठोड यांना फाडून खाल्ले असते. आजची सेनाही शिवसेनाप्रमुखांची नसून केवळ खुर्चीसाठी सर्वकाही सुरू असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली. राज्यात मुली, महिला सुरक्षित नसल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढविला. अन्यायग्रस्त युवती काेणत्या समाजाची व धर्माची असली तरी न्यायासाठी नेहमीच आवाज उठविणार, असेही वाघ म्हणाल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.