Jayant Patil – NCP-SP Sangli Gathering राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार की अजित पवार गटात जाणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज (दि. 15) सांगलीत जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा होणार आहे. त्यामुळे जयंत पाटील आज काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर हे विषय शांत होण्याआधीच ते अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. जयंत पाटील यांनी नुकतेच “माझं काही खरं नाही” असे विधान केले होते, त्यामुळे या चर्चांना अधिकच हवा मिळाली होती.
Jayant Patil – NCP-SP Sangli Gathering “माझं काही खरं नाही” विधानानंतर आज सांगलीत मोठा निर्णय?आज सांगलीतील मेळाव्यात जयंत पाटील सोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे तसेच जिल्ह्यातील अनेक माजी-आजी आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात जयंत पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
जयंत पाटील यांनी याआधी भाजप किंवा अजित पवार गटात जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. “मी पक्ष सोडणार नाही, पक्षासोबतच राहणार” असे त्यांनी यापूर्वी ठामपणे सांगितले होते. मात्र तरीही त्यांच्या पक्ष बदलाच्या चर्चा सुरूच राहिल्या आहेत.
बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. “मी नाराज नाही. माझं काही खरं नाही हे मी सहज बोललो होतो. त्यावरून मी पक्ष बदलतोय अशी चर्चा सुरू आहे. माध्यमांनीच ठरवलं आहे की, मला काहीतरी केलंच पाहिजे,” असे मिश्कील वक्तव्य त्यांनी केले.
आज सांगलीतील मेळाव्यात जयंत पाटील काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ते भाजपमध्ये जाणार का अजित पवार गटात सामील होणार, की पक्षातच ठाम राहणार, हे काही तासांत स्पष्ट होणार आहे.