Ram Satpute’s open challenge to Mohite Patil माळशिरस : माजी आमदार राम सातपुते यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटलांना आव्हान दिले आहे. “मी ११० वर्षे माळशिरसमध्येच राहणार आहे, कुठेही जाणार नाही,” असे वक्तव्य त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा भव्य सत्कार केला. या कार्यक्रमात बोलताना सातपुते यांनी मोहिते पाटलांचे नाव न घेता त्यांना थेट आव्हान दिले. निवडणुकीच्या काळात आपल्याविरोधात अफवा पसरवल्या गेल्या असल्याचे त्यांनी सांगितले. “राम सातपुते बंगला विकून इथून निघून जाणार आहेत, असे बोलले जात होते. पण मी स्पष्ट सांगतो की, माझं वय सध्या ३५ आहे. माणसाला १०० वर्षांचं आयुष्य असतं. मी ११० वर्षे जगणार असून तोपर्यंत माळशिरस सोडणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
राम सातपुते यांनी मागील पाच वर्षांत माळशिरस तालुक्यात माणसं जोडायचा एक मोठा कारखाना उभा केला आहे. “आजही माझ्याकडे रोज सर्वसामान्य जनता येते. तालुक्यातील जनतेला आता पश्चाताप होतो आहे की, थोडक्यात रामभाऊ पडले,” असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात बोलताना सातपुते म्हणाले, “माळशिरसमध्ये काम करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. मात्र, अंगात गोरगरिबांसाठी काम करण्याची जिद्द आहे. भाजपने मला सर्वसामान्यांसाठी काम करण्याची संधी दिली आणि मी ती संधी इमानेइतबारे पार पाडली. ज्या पक्षाने मला मोठं केलं, त्या पक्षाशी मी कधीही गद्दारी करणार नाही. मी हिंदुत्ववादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर चालणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील भाव समजून घेत काम करतो.”
सातपुते यांनी जनतेसाठी केलेल्या आरोग्यविषयक कामांवरही त्यांनी प्रकाश टाकला. “मी आमदार नसलो तरी रोज एक तास मतदारसंघातील पेशंटसाठी देतो. पुणे आणि मुंबईत माझे तीन ते चार आरोग्यसेवक काम करत असतात. गोरगरिब रुग्णांची राहायची आणि जेवणाची व्यवस्था नसेल, तर ती आम्ही करतो,” असे सांगून त्यांनी जनतेशी असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली.
सातपुते यांच्या या ठाम भूमिकेमुळे माळशिरसच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व आहे, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
