पुणे भाजपचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत करणार प्रवेश?, अजित पवारांचे धक्कातंत्र!

आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्षप्रवेशाचा विचार करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले

0

पुणे : प्रतिनिधी

निवडणुकीचे वातावरण तापू लागल्याने, पक्षांतराला वेग आला आहे. नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सध्या या पक्षातून त्या पक्षात उडी घेत असल्याने, यांना रोखण्यासाठी पक्षीय नेत्यांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. पुणे महापालिकेत सध्या अशीच काहीशी स्थिती बघावयास मिळत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट केल्याने, भाजपच्या गोठात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुर्तास पक्षप्रवेश नको अशी भूमिका घेतल्याने हा पक्ष प्रवेश सोहळा लांबणीवर पडला आहे. आरक्षण जाहीर झाल्यावर निर्णय घेऊ, असे विधान अजित पवारांनी केल्याने अनेक नगरसेवकांचा पक्षप्रवेश रखडणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षांचे नगरसेवक बंड पुकारण्याचा तयारीत आहेत. त्यांना पुढील पाच वर्षे नगरसेवकपद हवे असल्याने ते बंड करण्याच्या तयारीत असतात. भाजपचे काही नाराज नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप यांनी जाहीर केलं आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नगरसेवकांचा पक्षप्रवेश तूर्तास होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातील महापालिकेच्या आवारात भाजप नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली. त्यानंतर संजय राऊत यांना धमकीचे पत्र मिळाले. अशा घटना महाराष्ट्रात घडत असताना याला महापालिकेच्या निवडणुकीवरती किती परिणाम होईल हे सुध्दा पाहणं गरजेचं आहे. पण अजित पवारांनी आरक्षण झाल्यावर पक्षप्रवेशाबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतल्याने अनोख्या राजकीय चर्चेने वेग धरला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.