खड्याने केला घात, पपयाच्या ट्रकला भीषण अपघातात, १५ शेतमजूर जागीच ठार

0

जळगाव :रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात ट्रकवरील नियंत्रण सुटले अन्‌ ट्रक पलटी झाल्याने, १५ शेतमजूर जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील यावल-चोपडा रस्त्यावर घडली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, खड्यांचे हे बळी ठरल्याची चर्चा रंगत आहे. दरम्यान, या अपघातातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्व मृत शेतमजूर रावेर तालुक्यातील आभोडा, केन्हाळा व रावेर शहरातील असल्याचे समजते.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, रात्री एक वाजेच्या सुमारास पपयांचा ट्रक पलटी झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य आहे. या रस्त्यावरून ट्रक जात असताना एका वळणावर ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. ट्रकमध्ये पपई्‍ भरलेली होती. हा ट्रक बाजारपेठेकडे निघाला होता. तर ट्रकमध्ये भरलेल्या पपयांवर मजूर बसले होते. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे होते, हे खड्डे चकवण्याच्या नादात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, जळगाव आणि यावल येथील पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यानंतर मदतकार्याला वेग आला. पहिल्यांदा पलटी झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने सरळ करण्यात आला. त्यानंतर मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मृतांची नावे पुढीलप्रमाणे:
शेख हुसेन शेख (वय ३० रा. फकीरवाडा, रावेर), सरफराज कासम तडवी (वय ३२, केऱ्हाळा), नरेंद्र वामन वाघ (२५, रा. आभोडा), दिगंबर माधव सपकाळे (५५, रा. रावेर), दिलदार हुसेन तडवी (२०, आभोडा), संदीप युवराज भालेराव (२५, रा. विवरा), अशोक जगन वाघ (४०, रा. आभोडा), दुर्गाबाई संदीप भालेराव (२०, रा. आभोडा), गणेश रमेश मोरे (५, रा. आभोडा), शारदा रमेश मोरे (१५, रा. आभोडा), सागर अशोक वाघ (०३, रा. आभोडा), संगीता अशोक वाघ (३५, रा. आभोडा), सुमनबाई शालीक इंगळे (४५, रा. आभोडा), कमलाबाई रमेश मोरे (४५, रा. आभोडा), सबनुर हुसेन तडवी (५३, रा. आभोडा)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.