Video : उत्तराखंड जलप्रलय, १५० जण वाहून गेल्याची भिती, १६ जणांना सुखरूप बाहेर काढले

मदत कार्य सुरू, बेपत्ता नागरिकांना वाचविण्यासाठी जवानांचे शर्तीचे प्रयत्न

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा : उत्तराखंडमधील जलप्रलयात अनेकजण बेपत्ता झाले असून, सध्या बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत आयटीबीपीच्या जवानांनी १६ जणांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. अजूनही बचावकार्य सुरूच असून, अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आयटीपीबीचे जवना प्रयत्नशील आहेत. दरम्यान उत्तराखंडमधील जोशी मठाजवळ रविवारी सकाळी ही भयंकर घटना घडल्याचे समोर आले. चमोली जिल्ह्यातील रैनीत असलेल्या जोशी मठ परिसरात हिमकडा कोसळल्याने धौलीगंगा नदीवरील धरण फुटले. त्यामुळे धौलीगंगेच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्याने अचानकच पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नदीकाठच्या लाेकांना याचा जबरदस्त तडाखा बसला असून, अचानक आलेल्या पुरात अनेकजण बेपत्ता झाले आहेत. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरात रविवारी हिमकडा कोसळला. हिमकडा कोसळल्यानंतर रैनीसह अनेक गावांना  त्याचा तडाखा बसला. जोशी मठ परिसराजवळच ही घटना घडली असून, हिमस्खलन झाल्यानं ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालं आहे. धौलीगंगा नदीच्या प्रवाहात वाढ झाल्यानंतर गंगेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जोशी मठाच्या नुकसानीबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, हिमकडा कोसळल्यानंतर धौलीगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हिमकडा कोसळल्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह नदीतील धरणात येताना दिसत आहे. पाण्याच्या तडाख्यात नदीवरील दोन पुल वाहून गेले असून, एसडीआरएफने मदत कार्य सुरू केले आहे.

हेलिकॉप्टरने पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढले जात आहे. त्याचबरोबर सैनिकांनी बचावकार्यात उडी घेतली असून, आतापर्यंत १६ नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आहे. अजूनही बरेचसे लोक बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.