हलर्जीपणाचा कळस : १२ चिमुकल्यांना पोलिओ लसीऐवजी पाजले सॅनिटायझर!

यवतमाळ येथील धक्कादायक घटना

0

यवतमाळ : भंडारा येथील अग्निकांडाची घटना ताजी असतानाच यवतमाळमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा कळस दिसून आला. पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान, एक दोन नव्हे तर तब्बल १२ चिमुकल्यांना पोलिओच्या लसीऐवजी चक्क सॅनिटायझर पाजण्यात आल्याची संतापजनक घटना घाटंजी तालुक्यातील भांबोला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कापसी (कोपरी) येथे उघडकीस आली आहे. सॅनिटायझर पाजल्यामुळे १२ बालकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रविवारी रात्री यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव चौकशी समितीने दिला आहे. 

कापसी (कोपरी) येथील पोलिओ लसीकरण केंद्रावर रविवारी गिरीश किसन गेडाम, योगीश्री किसन गेडाम, अंश पुरुषोत्तम मेश्राम, हर्ष पुरुषोत्तम मेश्राम, भावना बापूराव आरके, वेदांत नितेश मेश्राम, राधिका नितेश मेश्राम, प्राची सुधाकर मेश्राम, माही सुधाकर मेश्राम, तनुज राम गेडाम, निशा प्रकाश मेश्राम व आस्था प्रकाश मेश्राम या बालकांना पोलिओ लसीऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आले. यानंतर  या बालकांना  मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  या बालकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.  ज्यावेळी मुलांना लस देण्यात आली, त्यावेळी लसीकरण केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका हे तिघे जण हजर होते, असे या बालकांच्या पालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट असून, संबंधितांवर तातडीने कारवाई केली जावी अशी मागणी समोर येत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.

सॅनिटायझरचे दोन थेंबही धाेकादायक : हॅण्ड सॅनिटायझरमध्ये ७० टक्के अल्कोहोल असते. त्याचे काही थेंब तोंडावाटे अत्यल्प प्रमाणात पोटात गेले तरी ते प्राणघातक ठरू शकतात. हे प्रमाण बालकांसाठी खूपच धोकादायक आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.