कठोर मेहनतीला पर्याय नाही – क्रीडापटू अभिषेक नायर

रोटरी इंटरॅक्ट वीक सप्ताहास शानदार सुरुवात

0

नाशिक : जीवनात प्रत्येक स्पर्धा व येणारे अपयश तुम्हाला पुढे कसे जायचे हे शिकवते. जिद्द, मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर स्वतःचा मार्ग स्वतः शोधल्यास यश निश्चित मिळविता येते. मात्र अनुभवाने स्वतःला समृद्ध करत निर्णय क्षमता विकसित करतानाच कठोर मेहनतीला पर्याय नाही असे मत क्रीडापटू तथा समालोचक अभिषेक नायर यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांत शालेय जीवनापासूनच नेतृत्व विकासाचे धडे मिळावेत, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवा, समाजाचे प्रश्न समजून त्यांच्यात सामाजिक भान जागृत व्हावे या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अंतर्गत शालेय स्तरावर निर्मिती करण्यात आलेल्या इंटरॅक्ट क्लबच्या वतीने दि. १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान झूम प्लॅटफॉर्मद्वारे आयोजित केलेल्या इंटरॅक्ट वीक सप्ताहात पहिले पुष्प अभिषेक नायर यांनी गुंफले. यावेळी ते बोलत होते. श्री. नायर यावेळी बोलताना पुढे म्हणाले, कठीण प्रसंगात असताना स्वतःलाच प्रश्न विचारा इतर लोक का चांगले आहेत आणि तुम्ही त्याची उत्तरे शोधा. मग त्यांच्यापेक्षा चांगले बना, समजून घ्या स्पर्धा काय आहे? त्याची एक प्रोसेस बनविल्यानंतर एक चांगला विद्यार्थी आणि माणूस बनू शकता.

छोटे छोटे ध्येय निश्चित करत मोठ्या ध्येयाकडे मार्गक्रमण केल्यास मिळालेल्या यशापासून कोणीही दूर करू शकणार नाही. आपल्या आयुष्यातला आनंदाचा क्षण सांगताना ते म्हणाले, भारताचे प्रतिनिधित्व क्रिकेटमध्ये केले रणजी ट्रॉफीच्यावेळी. यावेळी अपयश आल्यावरसुद्धा परत दमदार पुनरागमन करत चांगला परफॉर्मन्स देवून निंदा करणाऱ्यांचे तोंड गप्प केले. हा क्षण आनंदाचा होता असं ते म्हणाले. रोल मॉडेलबद्दल सांगताना सतत सावलीसारखी साथ देणारी आई, टी-२० मध्ये मेहनती रोहित शर्मा, क्रिकेटमध्ये कॅप्टन विराट कोहली हे रोल मॉडेल आहेत असं ते म्हणाले. आयपीएल हा आयुष्यातला टर्निंग पॉइंट व आयुष्याला स्थैर्य त्यानेच मिळवून दिल्याचेही त्यांनी सांगितलं. अनंता क्लबच्या अनुष्का आणि दुर्गेश यांच्याबरोबर प्रश्नोत्तरांचा खेळ उत्तरोत्तर रंगत गेला.

प्रारंभी अनंता इंटरॅक्ट क्लबचे प्रेसिडेंट ध्रूव बालाजीवाले आणि रोटरी क्लब नाशिकच्या अध्यक्षा मुग्धा लेले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. योगिनी त्रिवेदी हिने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. अनंता क्लबच्या दुर्वेश सांबरे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंटरॅक्ट वीक चेअर कमलाकर टाक, विनायक देवधर, सुचेता महादेवकर, उर्मिला देवधर, इंटरॅक्ट संचालक उर्मी दिनानी आणि अदिती अग्रवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.