अखेर संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा दिला राजीनामा – सूत्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण भोवले

0

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून चांगलेच अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती पुढे येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा चव्हाण प्रकरणाचा वाढता दबाव लक्षात घेऊन संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्री निवासस्थानी सादर केला आहे. मात्र त्यांचा राजीनामा मंजूर केला की, नाही याबाबतची कुठलीच माहिती समोर आली नाही. 

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्येनंतर बाहेर आलेल्या ऑडिओ क्लिप्समुळे एकच खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये मंत्री संजय राठोड यांचा सहभाग असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे विरोधकांनी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती. त्याचबरोबर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबतही विरोधकांनी मागणी केली होती. प्रकरण जास्त चिघळत असल्याचे लक्षात येताच संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.

दरम्यान, मुळची बीडची असलेली पूजा स्पोकन इंग्लिश शिकण्यासाठी पुण्याला गेली होती. या ठिकाणी तिने हेवन पार्क नावाच्या सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. वानवडी पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी काही ऑडिओ क्लिपचा हवाला देत संजय राठोड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी केली होती. तसेच भाजपचे आमदार व प्रवक्ते अतुल भातखळकर यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान, संजय राठोड गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचा राजीनामा स्विकारतील की, त्यांना एक संधी देतील याकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.